अमरावती- अमरावती व बडनेरा परिसरात असलेल्या विट भट्ट्यांवर कामासाठी आलेले सुमारे 600 मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. लॉकडाऊनच्या काळात बांधकामे ठप्प असून विटांचा माल पडून आहे. विटा बनवण्याचे काम देखील बंद असल्याने मजुरांना मजुरी देणे शक्य नाही. त्यामुळे या मजुरांचे हाल होत असून त्यांना तत्काळ घरी परत जाऊ देण्याची व्यवस्था शासने करावी, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
हेही वाचा- COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय
बडनेरा ते कोंडेश्वर आणि अंजनगाव बारी मार्गावर असलेल्या विट भट्ट्यांवर सुमारे 600 मजूर काम करतात. यातील बहुतांश मजूर मध्यप्रदेशातील आहेत. तर काही मजूर गोंदिया, भंडारा, मेळघाटातून येथील आहेत. लाॅकडाऊनमुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सामाजिक संस्था, विट भट्ट्यांच्या मालकांकडून या मजुरांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, आर्थिक चनचन भासत असल्याने काही मजुरांनी पायपीट करीत गावचा रस्ता पकडला. सध्या विट भट्ट्यांच्या लगतच असलेल्या झोपड्यांमध्ये हे मजूर वास्तव्यास आहेत.
महाराष्ट्र शासनाने त्यांना त्वरित आपापल्या क्षेत्रात परत पाठवण्याची व्यवस्था करुन द्यावी. हे मजूर अशिक्षित असल्याने ऑनलाइन अर्ज भरणे त्यांना शक्य नाही. या कामी शासनाची तयारी नसल्यास सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि जन सहभागातून वर्गणी करण्याची तयारी काही लोकांनी दर्शवली आहे. ऑनलाइन अर्जाऐवजी भट्ट्यांवर जाऊन त्यांची तपासणी करुन कुठलेही शुल्क न आकारता त्यांना घरी रवाना करणे आवश्यक आहे. या झोपड्यांपर्यंत कोरोनाची लागण झाल्यास भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यात त्वरित निर्णय व्हावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.