अमरावती - कॉम्रेड आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाद्वारे क्रांतिकारी सामाजिक अभिसरण अभिप्रेत आहे. आण्णाभाऊ नावाच्या युगसाक्षी प्रतिभेच्या व्यक्तीच्या नावाने भरणारे साहित्य संमेलन हे अमरावतीच्या साहित्यमयीन व्यक्तिमत्वाला अधिक तेजोमय करणारी बाब आहे. हे संमेलन सुरू करणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांना धन्यवाद देऊ, असे प्रतिपादन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात डॉ.यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेत नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कामगार नंदू नेतनराव यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन झाले. उदघाटन सोहळ्याला डॉ. भालचंद्र कांनगो, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.यशवंत मनोहर म्हणाले, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आता परिवर्तनवादी मराठी माणसाच्या जीवनातील एक चळवळ, एक आंदोलन झाले आहे. हे संमेलन समाजाला क्रांतिकारी करणारा, आधुनिक करणारा आणि राजकीय वर्गभान करणारा उपक्रम आहे.
अण्णाभाऊ साठे या प्रतिभावंतांबद्दल मला अतोनात आदर आहे. या आदराचे प्रमुख कारण म्हणजे केवळ ४९ वर्षाच्या काळात त्यांनी केलेल्या लेखनाचा अफाटपणा हे आहे. त्यांनी पन्नासहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ही पुस्तके आकाशातुन पडली नाहीत ती अण्णाभाऊंनी लिहिलीत. वाचन, चिंतन आणि त्या त्या वेळी कथेची, कादंबरीची, पोवाड्याची, वगनाट्याची व इतर लेखनाची निर्मिती निश्चित करणे, त्यातील टप्पे निश्चित करणे ही प्रक्रिया सोपी नाही. या सर्व गोष्टींचा आराखडा डोळ्यापुढे जिवंत उभा करायचा आणि नंतर लेखन करायचे हे सर्व काष्टाचे काम जिद्दीला पेटल्याशिवाय होत नाही. आणभाऊ साठे यांच्या जिद्दीला सलाम करावा असे डॉ.यशवंत मनोहर म्हणाले.