अमरावती - मेळघाटातील धारणी तालुक्यात एका दलित महिलेवर बलात्कार करण्यात आला, मात्र अजूनही आरोपींवर योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी आज अमरावतीतल्या राजकमल चौकात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
दरम्यान यावेळी बोलतांना अनिल बोंडे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला. नितीन राऊत हे उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊ शकतात, मग धारणी खूप दूर आहे का असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांनी देखील पीडित कुटुंबाची भेट घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.