अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लावण्यात आलेली अनेक बंधने शिथिल झाली आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यात सर्वच व्यवसाय धुमधडाक्यात सुरू झाले असताना लग्नसोहळा, अंत्ययात्रा अशा प्रसंगात मातंग समाजाला बँड वाजविण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे गुरुवारी बँडबाजा वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल मेळघाट दौऱ्यावर असल्याने डॉ. अनिल बोंडे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी मातंग समाजातील काही प्रतिनिधींसाह निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना निवेदन सादर केले. डॉ. अनिल बोंडे यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातून थेट राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. बँड वाजविण्याचा व्यवसाय करणारा मातंग समाज गरीब आणि विखुरलेला आहे. सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
समाजातील दोन व्यक्तींनी रोजगार ठप्प झाल्याने आत्महत्या केली आहे. आता सर्व व्यवसाय सुरू झाले असताना मातंग समाज बांधवांना कार्यक्रमात बँड वाजविण्याची परवानगी मिळावी, असे डॉ. अनिल बोंडे मुख्य सचिवांना म्हणाले. डॉ. अनिल बोंडे यांची मागणी लक्षात घेऊन मुख्य सचिव संजीव कुमार यांनी तत्काळ परवानगी देणार असल्याचे सांगितले.