अमरावती - सामाजिक वनीकरण विभागाच्या कुशल कामांतर्गत साडेचार कोटी रुपयांच्या निधीसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी अमरावती जिल्ह्यासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी अमरावती, धामणगाव रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, धारणी, मोर्शी, तिवसा, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, दर्यापूर, वरूड व नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वनीकरणाच्या पुढील कामांना गती मिळणार आहे.
वृक्ष लागवड नियोजन -
‘मी समृध्द तर गाव समृध्द’ या योजनेची 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने'शी सांगड घालून यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासह शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होण्यासाठी व रोजगारनिर्मितीसाठी देखील ही योजना लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
ग्राम समृद्धी व्हावी लोकचळवळ -
‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या विचाराचे एका लोकचळवळीत रुपांतर झाले पाहिजे. विविध योजनांच्या व सर्व यंत्रणांच्या समन्वयातून नियोजनबद्ध काम करण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
वनतळ्यांची निर्मिती करावी -
पालकमंत्र्यांनी मोर्शी तालुक्यातील मनरेगा व जलसंधारण कामांची बैठक घेऊन प्रशासनाला गतीने काम करण्याचे निर्देश दिले. जलसंधारणाच्या विविध कामांना गती मिळणे आवश्यक आहे. मात्र, काही कार्यालयांकडून तांत्रिक मान्यता व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जात नाही. त्यामुळे कामांचा वेग मंदावतो. कुठेही असे अडथळे येऊ नयेत व तांत्रिक प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी राम लंके, उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्यासह मोर्शी तालुका प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिले निर्देश -
वन विभागातर्फे जलसंधारणाच्या कामांबाबत आवश्यक मान्यता वेळेत द्याव्यात. वनतळ्यांची अधिकाधिक निर्मिती करावी व स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा. मनरेगा कामांची जलसंधारणांशी सांगड घालून भरीव रोजगारनिर्मिती करावी. कृषी विभागानेही केवळ फळबागा न करता ग्रामविकासाच्या दृष्टीने मनरेगातून नवनवीन उपक्रम राबवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.