अमरावती - मागील दोन दिवसांपूर्वी पथ्रोड परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळले होते. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नुकतेच अचलपूर तालुक्यातील कामतवाडा परिसरात प्रकाश डिके यांच्या शेतात वाघाने एका रानडुकराची शिकार केली आहे. वनविभागाने परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - मतदानाला आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार
वनविभागाने पायाचे ठसे तपासले असता हा वाघच असावा, असा अंदाज वर्तविला आहे. सद्या विदर्भात सोयाबीन पीक काढणी सुरू असल्याने वाघाच्या दहशतीने शेतकरी चिंतेत आहे. आधीच परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असताना हाती आलेले पीक वाघाच्या दहशतीमुळे वाया जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर कामतवाडा परिसरात हिंसक प्राणी असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये तलवार हल्ल्यात युवक जखमी