अमरावती - 'शाळेची आठवण तर येतेच पण लॉकडाऊन आहे ना... मग कसं जाणार शाळेत?' हा प्रश्न आहे राहुलचा. राहुल हा गतिमंद शाळेचा विद्यार्थी आहे. राहुलसारखीच त्याच्या अनेक मित्रांना शाळेची ओढ आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. याचेच अनुकरण करत गतिमंद विद्यार्थ्यांचे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विद्यार्थी देखील मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या शिक्षकांना पाहून आनंदी होत आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नात शिक्षक आणि पालक दोघांचीही दमछाक होत असल्याचे वास्तव आहे.
हर्षराज कॉलनी परिसरात असणारे शारीरिक अपंग विद्यालय, सातूरणा परिसरालागतची प्रयास विशेष शाळा, राजापेठ येथील बलिदान राठी विशेष शाळा, जिल्हाधिकारी कार्यालयामागे असलेले आशादीप विद्यालय आणि विद्यापीठ परिसरालागतचे निवासी विद्यालय अशा एकूण पाच शाळा अमरावतीतील गतिमंद विद्यार्थ्यांसाठी आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते 18 वर्ष वयापर्यंतचे विद्यार्थी या शाळेत आहेत.
गतिमंद विद्यार्थ्यांना त्यांना शाळा नेहमीच आवडते. 100 पैकी 99 विद्यार्थी हे त्यांच्या शाळेत रममाण होतात. त्यांचे शिक्षक, त्यांचे वर्गातील मित्र त्यांना फार प्रिय असल्याचे पालक आणि शिक्षक दोघेही सांगतात. 'शाळेची आठवण तर येते, सोबतच माझे मित्र पण आठवतात. मी तर सायकलने शाळेत जातो. व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो आता मात्र, लॉकडाऊन आले ना सगळं बंद झालं' अशा शब्दात राहुल शिंगोरे या विद्यार्थ्यांने शाळेबाबतची ओढ 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
गतिमंद विद्यार्थी काहीच करू शकत नाही, हाच मुळात समाजाचा गैरसमज आहे. समाजाचा हाच दृष्टीकोण बदलणे गरजेचे आहे. 10 पैकी 8 मुलांना जरी ऑनलाईन शिक्षणामुळे थोडासा लाभ झाला तर, आम्ही जिंकलो, अशी प्रतिक्रिया हर्षराज कॉलनी येथील शारीरिक अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र ढोले यांनी दिली.
शाळेतील किती विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉईड फोन आहे, याचा सर्व्हे करण्यात आला. पालकांच्या फोनवर योगासने, व्यायाम, कविता यांचे व्हिडिओ पाठवले जातात. पालक ते आपल्या मुलाकडून करवून घेतात. पालकांना जर कुठली अडचण येत असेल तर त्यांच्या मदतीसाठी आमचे शिक्षक विद्यार्थांच्या घरी जाण्यासाठीही तयार आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना नवीन काही शिकवायचे नाही मात्र, आत्तापर्यंत जे काही शिकवले आहे त्याचा विसर त्यांना पाडणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी असल्याचे जितेंद्र ढोले यांनी सांगितले.
सध्याच्या वातावरणात सर्वसामन्य व्यक्तीचं चिडचिडा झाला आहे. आमचे विद्यार्थीही फार चिडचिडे झाले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही पालकांशी संवाद साधून या मुलांसाठी घरीच चादरी आणि उशांचा वापर करून विविध खेळ कसे खेळायचे याची माहिती दिली. हे विद्यार्थी घरात खेळायला हवेत, यामुळे त्याची चिडचिड कमी होण्यास मदत होईल. ऑनलाईन शिक्षणाबाबत आम्ही पालकांचे प्रशिक्षण घेऊ, अशी माहिती प्रयास विशेष शाळेच्या मुख्याध्यापक सुनीता नाचणकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
या मुलांना योग्य पद्धतीने जेवण कसे करायचे याचे ज्ञानही शाळेतच दिले जाते. खरे तर अशा काही मुलांना चव म्हणजे काय हेच कळत नाही. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत जेवण कसे करायचे हे शिकवले होते. लॉकडाऊनमुळे घरीच असणाऱ्या या विद्यार्थ्यांचे जेवण आणि इतर दिनचर्येबाबत आम्ही पालकांकडून सतत माहिती घेतो, असे प्रयास विशेष शाखेच्या कला शिक्षिका अर्चना ठवळे यांनी सांगितले.
निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. या शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. अनेक पालकांना आपले पोट कसे भरायचे हाच प्रश्न आहे. त्यामुळे गतिमंद मुलांकडे त्यांचे विशेष लक्ष नसते. वर्षभर शाळेत राहणाऱ्या या विद्यार्थ्यांसोबत नेमके कसे वागायला हवे याचे ज्ञान पालकांना नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी ही देखील मोठी अडचण असल्याचे निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश धुमाळ यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात माझा मुलगा दिवसभर घरी आहे. ही मुले घरात सर्वाधिक आईच्याच संपर्कात असतात. आता एखादे गाणे लागले तर माझा मुलगा त्याला प्रतिसाद देतो. लॉकडाऊनच्या काळात शाळेत नेणारा रिक्षावाला जरी घरी आला, तरी ही मुले आनंद व्यक्त करतात, असे पालक श्रद्धा शिंगोरे म्हणल्या.
एकूणच कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात समाजातील सर्वच घटक ढवळून निघाला आहे. गतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळाही या परिस्थितीत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. ऑनलाईन शिक्षणाद्वारे गतिमंद विद्यार्थीही त्यांच्या अभ्यासात कसे गुंतून राहतील यासाठी शिक्षक आणि पालक मेहनत घेत असल्याचे दिसते.
अमरावती शहरातील विशेष शाळा आणि पटसंख्या -
शारीरिक अपंग विद्यालय हर्षराज कॉलनी - 40 विद्यार्थी
बलिदान राठी विद्यालय, राजापेठ - 40 विद्यार्थी
प्रयास विशेष शाळा - 40 विद्यार्थी
आशादीप विद्यालय - 40 विद्यार्थी
निवासी विद्यालय - 25 विद्यार्थी