अमरावती - राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला देखील ब्रेक लागला आहे. अमरावती जिल्ह्यात देखील १०० लसीकरण केंद्र पडले होते. अमरावती जिल्ह्यासाठी नव्याने 20 हजार कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने दोन दिवसांसाठी थोडा दिलासा मिळाला आहे. बंद पडलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
अमरावती जिल्ह्याला सुरुवातीला २ लाख १ हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले होते. आतापर्यंत त्या डोसच्या माध्यमातून अमरावती शहर व ग्रामीण भागांतील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून केंद्र सरकारकडून होणारा लसीचा पुरवठा बंद होता. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला होता. दरम्यान, आता पुन्हा 20 हजार डोस प्राप्त झाले आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी लसीचे १ हजार डोस दिले जातील उर्वरित लस ही अमरावती शहरासाठी असणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अडीच लाख कोविशिल्ड व दोन लाख कोव्हॅक्सिन लसीची मागणी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात लसीकरण सुसाट; बंद पडलेली 200हून अधिक केंद्र पुन्हा सुरू