अमरावती - शासकीय धान्याची तस्करी करून ते धान्य अवैधरित्या विकण्याचा प्रकार अमरावतीत समोर आला आहे. या प्रकरणात विदर्भातील सर्व कारागृह आणि शासकीय वसतिगृहांना धान्यपुरवठा करणाऱ्या कंत्रादारांसह एका धान्य व्यापाऱ्याला गडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सैय्यद मुनोज्जर अली सैय्यद मुजफ्फर आणि रिक्की राजकुमार साहू या दोघांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. गडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास शासकीय धान्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निषाद कॉलनी येथील मशिदीजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिस उपयुक्त यशवंत साळुंके यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगरचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर, सतीश देशमुख, विलास वाघपांजर, भारत वानखडे, प्रशांत वानखडे, भूषण वऱ्हाडे यांचे पथक निषाद कॉलनी येथे पोचले.
मशिदीलगत टिनाच्या गोदमजवळ एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसला. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यात 70 प्लास्टिकच्या पोत्यात एकूण 18 क्विंटल तांदूळ आढळून आले. पोलिसांनी गोदाम मालक सय्यद मुनोज्जर अली सैय्यद मुजफ्फर याला बोलावून ट्रक मध्ये असणाऱ्या शासकीय तांदूळाबाबत विचारले असता त्याने हे तांदूळ इतवारा बाजार स्थित रिक्की राजकुमार साहू याच्या धान्य दुकानातून खरेदी केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी रात्री रिक्की साहू याला ताब्यात घेऊन शासकीय तांदूळ कुठून आणले आणि ते कसे काय विकले याची चौकशी केली. सय्यद मुनोज्जर अली सैय्यद मुजफ्फर आणि रिक्की साहू अवैधरित्या शासकीय धान्य विकत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी उत्पादक वस्तू अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
शासकीय तांदूळ अवैधरित्या विकला जात असल्यामगे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.सैय्यद मुनोज्जर अली सैय्यद मुजफ्फर हा विदर्भातील सर्व कारागृह आणि शासकीय वसतिगृहांना धान्य पुरवठा करणारा कंत्रादर आहे. शासकीय व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सैय्यद मुनोज्जर अली सैय्यद मुजफ्फर हा शासकिय धान्याचा काळाबाजार करत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सैय्यद मुनोज्जर अली सैय्यद मुजफ्फर आणि रिक्की साहू यांची याबाबत कसून चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर येईल असे पोलीसांचा अदाज आहे.