अमरावती - शहरातील छत्रसाल परिसरात राहणाऱ्या चोरट्याने परिसरातीलच घर फोडून मोठा हात साफ केला. या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच या घरफोड्या चोरट्यास गाडगेनगर पोलिसांनी तीन तासांच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेतले. छत्रसाल परिसरातील रहिवासी मनीष बलखंडे हे मंगळवारी सायंकाळी अमरावतीपासून जवळच असणाऱ्या मंगरूळ चव्हाळा या गावाला कुटुंबासह आईला भेटायला गेले होते.
आज सकाळी ते घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचा दराचे कुलूप तोडून चोरट्याने एलईडी, होम थिएटर, सोन्याच्या दोन अंगठ्या, 15 ग्रॅम असणारे तीन जोड सोन्याचे दोन कानातले टॉप्स, 8 ग्रॅमची पोत, 8 ग्रॅमचे सोन्याची नथ, 5 ग्रॅम वजनाची चेन असे 40 ग्रॅम वजनाचे आणि 1 लाख 11 हजार 500 रुपयांचे दागिने आणि 5 हजार रुपयांचा किराणा असे एकूण 1 लाख 46 हजार रुपयांचा माल चोरीला गेलताचे त्यांच्यात लक्षात आले. याबाबत त्यांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, या प्रकारानंतर गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके, हेड कॉन्स्टेबल अहेमद अली, भारत वानखडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वानखडे, जाहीर शेख यांनी अवघ्या तीन तासांच्या आत तेजस उर्फ बंटी जानराव वानखडे (19) या छत्रसाल नगर परिसरातच राहणाऱ्या चोरट्यास अटक केली. त्याच्याजवळून चोरी केलेल्या मालापैकी एकूण 1 लाख 41 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.