अमरावती - एकीकडे ३० तारखेपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही नियमांचे पालन न करता विनाकारण फिरणाऱ्या बेशिस्त १२०० वाहन चालकांवर वाहतूक शाखेने दंडाचा हातोडा मारला आहे. मागील केवळ ३ दिवसातच १२०० वाहन चालकांवर कार्यवाही करत वाहतूक शाखेने त्यांच्याकडून तब्बल २ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केलेला आहे. अमरावती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.
लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांनीं काम नसताना विनाकारण घराबाहेर पडू नये. डबल सीट, ट्रिपल सीट वाहन चालवू नये. चारचाकी वाहनात केवळ तीन लोकांनी प्रवास करावा, अशा सूचना वारंवार करूनही अमरावतीमधील नागरिक नियम पाळत नसल्याचे समोर आले होते. यानंतर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक शाखेने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार मागील ३ दिवसांपासून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबवल्या गेली. त्यात १२०० वाहन चालकांवर कारवाई करत अमरावती वाहतूक शाखेने २ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.