अमरावती - दर्यापूर तालुक्यातील काटेवाडी येथे तीस वर्षीय काकाने सहा वर्षाच्या पुतणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचे पडसाद शहरात उमटत आहेत.
दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथे अजिंक्य(काल्पनिक नाव) नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या सहा वर्षीय पुतणीवर शारीरिक अत्याचार केला. यानंतर त्याने चिमुकलीचा गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडित चिमुकलीला गुरुवारी रात्री उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ आज अमरावतीत मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाईने काही वेळ चक्काजाम केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अत्याचार करणाऱ्या या नराधमाचा हैदराबाद मध्ये घडलेल्या प्रकरणाप्रमाणेच एन्काऊंटर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रशासनासह पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.
तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.