अमरावती - सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. मात्र, काहीजण पोलिसांना डिवचण्यासाठी मुद्दामहून काही ना काही विक्षिप्त कृत्य करत असतात. असाच एक प्रकार अमरावतीच्या चित्रा चौकात घडला. येथे पोलिसांचा बंदोबस्त असलेल्या ठिकाणी एक युवक दुचाकीवर येऊन पोलिसांसमोर मुद्दामहून थुंकला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.
मासानगंज परिसरात औषधी दुकान पोलिसाने बंद केल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर चित्रा चौक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. चौकात जवळपास १७ ते १८ पोलीस तैनात होते.
दरम्यान, एक युवक दुचाकीवर आला आणि त्याने तोंडावरील मास्क काढून पोलिसांसमोर तो थुंकला. या प्रकारामुळे संतापलेल्या पोलिसांनी सदर युवकाला खडसावून रस्त्यावर थुंकलेलं पुसायला लावले. सभोवताली पोलीस जमल्यामुळे मुजोर युवकाने कसाबसा रस्ता पुसला. यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त करून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेली.