अमरावती - जिल्ह्यातील आरोग्य विभाग आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागातील ८ तर एक पोलीस असे एकूण ९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
अमरावती शहरातील कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह दोन परिचारिका सहाय्यक आणि दोन सफाई कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील विलगिकरण कक्षात सेवा देणाऱ्या परिचरिकेलाही कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बंदोबस्तावर असणाऱ्या गाडगेनगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोना झाला आहे.
कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने, त्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन कमी पडत असल्याचे निदर्शनात आले आहे. दरम्यान, सरकारने कोरोना योद्ध्यांसाठी 50 लाखाच्या विम्याची घोषणा केली आहे. पण अद्याप एकही कोरोना रुग्णांचा विमा अर्ज भरण्यात आलेला नाही, अशी माहिती रोजंदारीवर सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांनी दिली.
हेही वाचा - राज्यात सोमवारी आढळले कोरोनाचे २,४३६ नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ६६७ वर
हेही वाचा - अमरावती जिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरसह 6 नवे कोरोनारुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 170 वर