अमरावती - जगभर आज (शुक्रवारी) 'व्हॅलेंटाईन डे' साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्व संध्येला प्रेम विवाह न करण्याची सामूहीक शपथ घेतली. सद्यपरिस्थितीत मुलींवर होणारे अत्याचार, अॅसीड हल्ले पाहता प्राध्यपकाने मुलींना ही शपथ दिली. एवढ्यावरच न थांबता मुलींनी हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न करणार नसल्याची शपथ घेतली आहे.
हेही वाचा -
काय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमाची परिभाषा?
महिला कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेंभुर्णी गावात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मुलींनी अशी शपथ घेतली. प्राध्यापक प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर दंदे यांनी मार्गदर्शन केले. मुलींवर होणारे वाढते अत्याचार या मुद्द्यावरही त्यांनी उहापोह केला. त्यानंतर मुलींनी घेतलेल्या शपथेमध्ये 'सध्याच्या रीतिरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देऊन लावले तर भावी पिढीतील एक माता म्हणून, माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही व मुलीसाठी हुंडा देणार नाही.' अशीही शपथ मुलींनी घेतली.
यावेळी प्यारेलाल सूर्यवंशी, राजेंद्र हावरे, अशोक पडवेकर उपस्थित होते शिबिरातील विद्यार्थिनी वैष्णवी गोखे, श्रेया जैन, अर्चना जैन, निशा नाईक, रुचिरा रंगारी, पल्लवी मोरे,तेजस्वी बोबडे, भुवनेश्वरी देशमुख, अंकिता वानखेडे, संगीता साऊतकर, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा -