अमरावती - देशाच्या उच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला एकदा तरी भेटण्याची प्रत्येकाची इच्छा असते. देशाच्या उच्च स्थानी विराजमान असलेल्या पंतप्रधानांना भेटणे हे सहज शक्य नाही. मात्र, जिल्ह्यातील परतवाडा शहरातील श्रेया दौड या विद्यार्थीनीची पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमासाठी निवड झाली होती.
हेही वाचा - अधिकाऱ्याला गुटखा देत युवक काँग्रेसचे आंदोलन
श्रेया अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकते. श्रेयाचे बालपणापासून देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचे स्वप्न होते. पण पंतप्रधान यांना भेटणे हे सहज शक्य नसल्याचे श्रेयाला माहीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात तिने भाग घेतला. त्यासाठी तिने ऑनलाईन अर्ज केला. तिकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि तिला पंतप्रधान मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली.
हेही वाचा - बच्चू कडुंची 'राहुटी'... विविध शासकीय कागदपत्रांची कामे एकाच मंडपात
दिल्ली येथे 20 आणि 21 जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभरातून 2500 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातून 82 तर अमरावती जिल्ह्यातील केवळ दोन विद्यार्थ्यांना संधी मिळाली. ज्यामध्ये श्रेया हिला पंतप्रधान मोदी यांना भेटता आले. श्रेयाच्या या कामगिरीवर तिच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परीक्षेविषयी अनेक प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी दिली. पंतप्रधानांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने आपण खूप आनंदी असल्याचे तिने सांगितले. श्रेया ही शाळेत खूप हुशार आहे. तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहे. तसेच तिच्यामधील एक गुण कौतुकास्पद आहे. श्रेयाला लहानपणापासून सामाजिक कार्याची खूप आवड आहे. ती दरवर्षी मेळघाटसारख्या दुर्गम भागात जाऊन आदिवासी मुलांना दिवाळीत फराळ कपड्यांचे वाटप करते. तिच्या कार्याला तिचे घरचेही मदत करतात.
श्रेया ही जेमतेम नवव्या वर्गात आहे. तिने पंतप्रधानांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात सहभागी होऊन एक नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे तिने अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. श्रेयाला भविष्यात आयएएस ऑफिसर होऊन लोकांची सेवा करायची आहे.