अमरावती - सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात केवळ रुग्णालय आणि मेडिकल सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या टरबूज पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे शेतमाल बाजारात कसा घेऊन जायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. परिणामी शेतकऱ्यांचे विकायला आलेले पीक सध्या शेतात खराब होत आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सागर ठाकूर हा शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात टरबूज पिकाची लागवड करतो. मात्र, यंदा लॉकडाऊन लागला असल्याने टरबूज शेतात खराब होत आहे. यामुळे सागरने टरबूज विक्रीची परवानगी तहसीलदारांकडे मागितली आहे.
राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जीवनाश्यक वस्तू, फळांची दुकाने लावण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह फळांची दुकानेही बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वच फळांची दुकाने बंद आहे. याचाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागील वर्षीही लॉकडाऊनमध्ये टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे फळ विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.