अमरावती - जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजाराच्या जवळ पोचली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून शनिवारी आणि रविवारी संपूर्ण जिल्हा बंद राहणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, बदनेरचे आमदार रवी राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे हे एकदा कोरोनामुक्त होऊन दुसऱ्यांदा कोरोनाग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरले असून 24 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान पूर्णतः लोकडाऊन असणारा अमरावती जिल्हा 30 एप्रिल पासून मिशन बिगीन अगेनच्या नावाखाली कोरोनापासून भयमुक्त झाल्याचे वातावरण निर्माण करून प्रशासनाने लोकांना घराबाहेर गर्दी करण्यास सूट दिली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ सुरू राहत असून बाजारात दिवसभर गर्दी दिसते आहे. शहरात होणारी गर्दी नियंत्रांत असावी यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा कुणीही काही करीत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 802 वर पोचला असून कोरोनामुळे जिल्ह्यात 83 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवार ते शुक्रवार आठवड्यातून हे 5 दिवस सायंकाळी 7 पर्यंत शहरात मंदिर, चित्रपटगृह आणि शाळा वगळता सर्व काही सुरू झाले असल्याने बाहेर नागरिकांची गर्दी वाढली तशी कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढत आहे. असे असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे गत चार आठवड्यांपासून शनिवारी आणि रविवारी जिल्हा बंदचे आदेश काढत आहेत.