अमरावती - शहरातील कंवरनगर चौकातील मृत पानटपरी चालकाच्या कुटुंबातील तिघे कोरोनाबधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर प्रशासनाने पानटपरी चालकासह त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वतः हून समोर यावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने केले आहे.
कंवरनगर परिसरातील ५४ वर्षीय पानटपरी चालक अचानक आजारी पडला होता. खाजगी रुग्णालयात २ दिवस उपचार केल्यावर त्यास २७ एप्रिलला विशेष कोरोना रुग्णालयात दाखल करताच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आजरी पडण्यापूर्वी या व्यक्तीने लॉकडाऊन असताना मोठ्याप्रमाणात खर्रा, गुटखा पुड्या विकल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची स्वॅब तपासणी झाली नसली तरी आज त्याच्या घरातील एक महिला आणि दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कंवरनगरसह लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. मृत पानटपरी चालकाच्या संपर्कात जे कोणी व्यक्ती आलेत त्यांनी स्वतः हून समोर यावे आणि कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा- अंत्ययात्रेत सहभागी 6 जण क्वारंटाईन; नगर परिषदेकडून परिसरात निर्जंतुकीकरण