अमरावती - राज्यभरात थंडीचा जोर वाढला असतानाच पावसाने हजेरी लावली. वातावरणातील या बदलामुळे गुरुवारी सकाळी अमरावती धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, थंडी आणि पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडत असून या परिस्थितीत स्वेटर घालावे की रेनकोट, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला आहे.
कडाक्याची थंडी आणि पावसामुळे वातावरण पार बदलले असताना अमरावती शहर गुरुवारी सकाळी पूर्णतः धुक्याने वेढले गेले. शहराचा मध्यबिंदू असणारी मालटेकडी, वडाळी तलाव येथील टेकडीवर असणारा रेल्वेचा टॉवर धुक्यामुळे काही वेळ दिसेनासा झाला होता.
हेही वाचा - शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...
गेल्या ४ दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे तापमान १६ ते १७ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले असताना शहर आणि जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे.
कडाक्याच्या थंडीत कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस बरसत असल्यामुळे वातावरणही रंगतदार झाले आहे. यातच, गुरुवारी पहाटे शहरात सर्वत्र धुके पसरल्यामुळे वातावरणातही वेगळीच रंगत पाहायला मिळाली. दरम्यान, दाट धुक्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याची चिन्हे असताना अचानक पडलेला पाऊस आणि गारपिठीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा - काकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार, दर्यापूर येथील प्रकार