अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा कायद्याला राज्यात स्थगिती दिली आहे. यामुळे भाजपाच्यावतीने आज (मंगळवारी) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या पुतळ्यासह स्थगिती आदेशाची होळी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली.
राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याची धिंड काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविणाऱ्या घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या. कृषी कायदा हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला विक्रीचे स्वतंत्र देणारा आहे. असे असताना हा कायदा लागू करण्यास महाविकास आघाडी सरकारने आडकाठी आणून शेतकाऱ्यांपेक्षा दलालांचे हित जोपासण्याचे काम केले आहे, असा आरोप यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी पोलिसांनी भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक जळणारा पुतळा विझवून तो ताब्यात घेतला.
आंदोलनात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातूरकर, महापौर चेतन गावडे, उपमहापौर कुसुम साहू, तुषार भारतीय, रविराज देशमुख, आदी. सहभागी होते. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.