अमरावती - अमरावतीत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या सातपैकी तीन आरोपींना मिळालेला अंतरिम जामीन आज न्यायालयाने रद्द केला आहे.
हेही वाचा - खतांच्या दरवाढीविरोधात बच्चू कडू यांचे उद्या 'टाळी-थाळी बजाव' आंदोलन
पोलीस महासंचालकांच्या आदेशाने पोलिसांनी दाखवले गांभीर्य
या प्रकरणात तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन दत्तात्रय मालसुरे, एनआरएचएम अंतर्गत काम करणारा अक्षय राठोड, संजीवनी हेल्थ केअर सेंटरला कार्यरत टेक्निशियन अनिल गजानन पिंजरकर, शासकीय कोविड रुग्णालयातील अटेंडंट शुभम सोनटक्के, महावीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत अटेंडंट शुभम किल्लेकर, परिचारिका बेबी सोनावने या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.
तीन आरोपींचा जामीन रद्द
१२ मे रोजी या टोळीला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडीच मागितली नसल्याने या गंभीर प्रकरणात सखोल चौकशी न होता आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. यानंतर या प्रकरणात डॉ. पवन मालसुरे, अक्षय राठोड आणि बेबी सोनावने यांना अंतरिम जमीन मिळाला. तर चौघांपैकी अनिल पिंजरकरला कोरोना असल्याने त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले आणि उर्वरित तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत सदर तीन आरोपींना मिळालेला अंतरिम जामीन न्यायालयाने रद्द केला.
चौकशी अधिकारी बदलले
या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात आली नसल्याने भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आणि माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली होती. यानंतर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक फुंडकर यांच्याकडे असणारी चौकशी काढून ती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बाचाटे यांच्याकडे सोपवली. आता आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित रुग्णालयातून महत्वाचे पुरावे मिळवून न्यायालयासमोर आरोपींची जमानत रद्द करण्याबाबत से दाखल केला होता.
आरोपींची होणार चौकशी
या प्रकरणात तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन दत्तात्रय मालसुरे, एनआरएचएम अंतर्गत काम करणारा अक्षय राठोड, संजीवनी हेल्थ केअर सेंटरला कार्यरत टेक्निशियन अनिल गजानन पिंजरकर, शासकीय कोविड रुग्णालयातील अटेंडंट शुभम सोनटक्के, महावीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत अटेंडंट शुभम किल्लेकर, परिचारिका बेबी सोनावने आणि पीडिएमसी रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉय असणारा विनीत अनिल फुटाणे यांची चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी सर्व आरोपींना पोलीस ताब्यातही घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अमरावतीतील कापड बाजारपेठेला लॉकडाऊनचा कोट्यावधींचा फटका