अमरावती - संपूर्ण विश्वाला मानवतेचा व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११० व्या जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सवाचे औचित्य साधून, अमरावतीच्या तिवसा शहरात आज सर्वधर्मीय सामूदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सर्वधर्मीय लोकांनी या सामुदायिक प्रार्थनेला आवर्जून उपस्थिती लावली.
आज तालुक्यातील समस्त गुरुदेव सेवा मंडळ, सेवारत फाऊंडेशन, सामाजिक संघटना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तिवसा तालुकाद्वारा आयोजीत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ११० वी जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्ताने तालुका स्तरीय विश्वव्यापी सर्वधर्मीय सामुदायीक प्रार्थना व विविध कार्यक्रमांचे आयोजन स्व. आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय तिवसा येथे करण्यात आले होते. यामध्ये सकाळी सामुदायिक ध्यान, ग्रामस्वच्छता सायंकाळी ५ वाजता प्रभातफेरी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी सर्व धर्मिय प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.
रात्री ७ ते ८ वाजता महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते जावेद पाशा कुरेशी याचे व्याख्यान झाले. तर रात्री ८ ते १० सप्तखंजरी वादक तुषार सुर्यवंशी नागपुर यांचे राष्ट्रीय समाजप्रबोधनपर कीर्तन झाले. या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्म पंथ संप्रदायातील मंडळी तालुक्यातील संपुर्ण ७२ गावामधील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला होता.