अमरावती - पैशासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकून टाकणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुहास चिमटे असे या बापाचे नाव आहे. मुलगा सांभाळणे मुश्किल झाल्याचे सांगत त्याला फक्त ५ हजारात विक्री करायला निघालेला दगडाच्या काळजाचा बाप मूळचा अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याचा रहिवासी आहे.
आज सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या आनंद मेळ्याव्याच्या ठिकाणी तो मुलासह आला. दारु पिऊन मुलासह फिरणाऱ्या या व्यक्तीला हाफीज खान यांनी हटकले. त्यावर मुलगा विकायचे असल्याचे सुहास चिमटेने सांगितले. ५ हजार द्या आणि मुलगा घ्या असे तो म्हणत होता. हाफीज यांनी अडीच हजाराची बोली लावली, विशेष म्हणजे याला तो तयार झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हाफीज यांनी त्याला गुंतवून ठेवले आणि पोलिसांशी संपर्क केला. कोतवाली पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन या दारुड्या बापाला ताब्यात घेतले.
दरम्यान, चिमटे यांच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क साधला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.