अमरावती - ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्या महिलेच्या तक्रारीवरून एका तरुणीसह पोलीस कर्मचाऱ्यावर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश अशोक सोळंके (३०, रा.वरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन मुलींची आई असणाऱ्या महिलेची लग्नापूर्वी प्रेम असणाऱ्या महेश सोबत फेसबुकवर भेट झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यावर त्यांचे प्रेमप्रकरण पुन्हा नव्याने सुरू झाले. यानंतर बागेत भेटायला जाणे, तिचे त्याच्या घरी अमरावतीवरून वरुडला जाणे सुरू झाले. याचदरम्यान, ३ मे रोजी महेशने त्या महिलेला वडाळी उद्यानात भेटायला बोलवले. उद्यानात भेटल्यानंतर महेशने तिला आपल्या सोबत वरूडला नेले. मात्र, तिला सोबत ठेवण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे या महिलेने हातावर ब्लेड मारून स्वतःला जखमी केले. यानंतर महेशने तिच्यावर उपचार करून भाड्याने गाडी करून अमरावतीत पाठवले.
महिला घरातून निघून गेल्याने तिच्या पतीने तिचा सर्वत्र शोध घेतला. तिच्या भावाने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची माहिती मिळताच महेशने तिला फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या महिलेने मला पतीऐवजी महेशसोबत राहायची इच्छा आहे, असे पोलिसांने सांगितले. त्यानंतर महेशने त्या महिलेला सोबत वरूडला आणले. मात्र, या प्रकरणाने पुन्हा एक नवे वळण घेतले. महेशच्या ओळखीतील एका युवतीने त्या महिलेला महेशच्या घरातून निघून जाण्यास सांगितले आणि तिला मारहाण केली. यावेळी महेशने सुद्धा त्या महिलेला मारहाण केली. या घटनेनंतर महेश आणि त्याच्या मित्रांनी त्या महिलेची समजूत काढून अमरावतीला घरी परत जा, असा सल्ला दिला आणि तिला अमरावतीला आणून सोडले. यानंतर त्या महिलेने थेट फ्रेजरपुरा पोलीस गाठले आणि आपल्यावर महेशने अत्याचार केला तसेच त्याने आणि त्याच्या परिचयातील एका युवतीने मारहाण केली, अशी तक्रार दिली. याप्रकरणात पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून महेशसह एका युवतीवर गुन्हा दाखल केला.