अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे 28 जानेवारीला निधन झाले. ते आजारी असल्यामुळे त्यांनी कुलगुरू पदाचा प्रभार प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडे सोपविला होता. नियमानुसार डॉक्टर दिलीप मालखेडे यांचे निधन होताच प्रकुलगुरू विजयकुमार चौबे यांचा कार्यकाळ देखील त्याच क्षणी नियमानुसार संपुष्टात आला होता. असे असताना देखील डॉक्टर विजयकुमार चौबे हे 3 फेब्रुवारीपर्यंत प्रभारी कुलगुरू म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत होते. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 अंतर्गत विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ ज्या दिवशी संपतो, त्याच दिवशी प्रभारी कलगुरूंचा कार्यकाळदेखील संपुष्टात येतो. किंवा प्रभारी कुलगुरू हे 65 वर्षाचे झाले तर नियमानुसार ते सेवानिवृत्त होतात.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी : या दरम्यान स्वयंघोषित कुलगुरू म्हणून डॉक्टर विजयकुमार चौबे यांनी विद्यापीठाचे कामकाज पाहिले. तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय तथा विद्यार्थ्यांची निगडित विभागाच्या अधिकार नसताना स्वतःच्या स्वाक्षरीने मंजूर केल्या. ही बाब अतिशय गंभीर असून शासनाच्या सेवा शर्तीचा भंग करणारी आहे. त्यांच्याकडे या काळातील कोणतेही कुलगुरू म्हणून पद स्वीकारण्याचे पत्र नसताना सुद्धा कुलगुरू म्हणून कारभार करणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधानसहित अंतर्गत कारवाई व्हावी, अशी तक्रार युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी फ्रेजरपूरा ठाण्यात 24 मार्च रोजी दिली. या तक्रारीनुसार आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
माहिती अधिकारात माहिती देण्यास नकार : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी विभागात 1 जून 2016 ते 30 जून 2022 या कालावधीत डॉ. विजयकुमार चौबे यांनी वेळापत्रकाप्रमाणे घेतलेल्या तासिका व विद्यार्थी, उपस्थित असलेली हजेरी पुस्तके यासंदर्भात उत्तम इंगोले या विद्यार्थ्याने माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास डॉक्टर विजयकुमार चौबे यांनी नकार दिला होता. या संदर्भात उत्तम इंगोले याने जन माहिती अधिकाऱ्याकडे अपील दाखल केली होती. या संदर्भात संबंधित सर्व माहिती अर्जदारास देण्याचे आदेश जन माहिती अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना बजावला होता.
राज्यपालांकडेही तक्रार : डॉ. विजयकुमार चौबे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कार्यरत असताना भारतासह परदेशातील एकूण 71 प्रकारचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहे. हे अभ्यासक्रम कोणत्या वर्षी ते उत्तीर्ण झालेत याबाबतची माहिती देखील उत्तम इंगोले यांनी मागितली होती. ही माहिती मिळाली नसल्यामुळे त्यांनी या संदर्भात थेट राज्यपालांकडेच माहिती मिळण्याबाबत विनंती केली होती. डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्या संदर्भात राज्यपालांकडे आलेल्या पत्रावर राज्यपालांच्या सचिव कार्यालयाने 11 जानेवारी 2023 ला उत्तम इंगोले यांना एक पत्र दिले.
माहिती राज्यपाल कार्यालयाला उपलब्ध नाही : या पत्रात डॉक्टर विजयकुमार चौबे यांचा जो बायोडाटा राज्यपालभावनाकडे आला आहे. त्यामध्ये त्यांनी उत्तीर्ण केलेल्या परीक्षांची नोंद आहे. मात्र त्यांनी कोणत्या परीक्षा उत्तीर्ण केल्या, त्या विषयांची संख्या, उत्तीर्ण केलेले वर्ष, लागलेला कालावधी इत्यादी माहिती राज्यपाल कार्यालयाला उपलब्ध नाही. ही माहिती डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्याकडूनच उपलब्ध करून घ्यावी, असे देखील उत्तम इंगोले यांना राज्यपालांच्या सचिव कार्यालयातील शिक्षण उपसचिव प्राची जांभेकर यांनी उत्तम इंगोले यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.
कुलसचिवांच्या भूमिकेमुळे गैरसमज : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांचे निधन झाल्यामुळे नियमानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे यांचा कार्यकाल देखील संपुष्टात येतो. असे असले तरी त्यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून पदाचा गैरवापर केल्या संदर्भात आम्ही सिनेटच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला. हा प्रकार अयोग्य असल्याचे म्हटले. माझ्यासह इतर सदस्यांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी कुठलाही खुलासा केला नाही. या विषयासंदर्भात त्यांना दुर्दैवाने कुठली माहिती देखील नव्हती. आता आम्ही या संदर्भात संपूर्ण चौकशी केली असता अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे राज्यपालांनी झोपवितांना तसे पत्र प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर विजयकुमार चौबे यांना दिले होते. ही साधी माहिती कुलसचिवांनी सिनेटमध्ये द्यायला हवी होती, मात्र ते यावर काहीच बोलू शकले नसल्यामुळे डॉक्टर विजयकुमार चौबे यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण झाला, असे नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य डॉक्टर प्रवीण रघुवंशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.
कुलसचिव गप्प राहिल्याने गोंधळ : 1 जून 2022 पासून मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रभारी कुलगुरू म्हणून रुजू झालो. 19 ऑक्टोबरला कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे हे आजारी असल्यामुळे रजेवर गेले. त्यावेळी त्यांनी माझ्याकडे प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार दिला. याबाबत दोन नोव्हेंबर 2022 ला राज्यपाल भवनाकडून मला प्रभारी कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात पत्रही मिळाले. दरम्यान कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे यांचे 27 जानेवारीला निधन झाले. नियमानुसार कुलगुरू यांचा कार्यकाळ समताच किंवा त्यांचे असे आकस्मिक निधन झाल्यास प्रकलगुरूचा कार्यकाळ संपतो. यामुळेच मी राज्यपाल भवनाशी संपर्क साधून त्यांना या संपूर्ण परिस्थितीबाबत अवगत केले. त्यावेळी राज्यपाल हे दौऱ्यावर गेले असल्यामुळे मलाच प्रभारी कुलगुरू म्हणून काम पहावे असे सांगण्यात आले. 3 फेब्रुवारी 2023 ला राजभवनाने माझ्या नावाने पत्र काढून कुलगुरू पदाचा प्रभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना स्वीकारण्यासंदर्भात मला राजभावनातून ईमेल द्वारे तसेच व्हाट्सअपवर पत्र प्राप्त झाले.
कुलसचिव गप्प : 4 फेब्रुवारीला डॉक्टर प्रमोद येवले यांना मी रीतसर प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविला. यानंतर 10 फेब्रुवारीला राज्यपाल भवनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला मला 3 फेब्रुवारीला ईमेलवर पाठविलेल्या पत्राची मूळ प्रत पोस्टाने पाठवली. ही प्रत कुलसचिवांना प्राप्त झाली असताना देखील 14 मार्च रोजी झालेल्या सिनेटच्या बैठकीत माझ्या प्रभारी कुलगुरू पदासंदर्भात राज्यपाल भावनाकडून पत्र प्राप्त झाले का? यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर कुलसचिव गप्प बसले. यामुळेच सर्व गोंधळ उडाला असल्याचे डॉक्टर विजयकुमार चौबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले आहे. राज्यपालांकडे जी काही तक्रार करण्यात आली, त्यामध्ये काही एक तथ्य नाही. जी काही माहिती संबंधित व्यक्तीला हवी आहे, त्या माहितीशी माझा काही संबंध नाही. ही सर्व प्रशासकीय बाब असल्याचे देखील डॉक्टर विजयकुमार चौबे यांनी म्हटले आहे.