अमरावती - मागील तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात पाण्यासाठी रणकंदन सुरू आहे. या पाण्यासाठी तर आमदार यशोमती ठाकूर यांनी अभियंत्याला शिवीगाळ केली होती. त्यामुळे हे प्रकरण खूप गाजले. शेवटी सोमवारी दुपारी ३ वाजता अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात आले. मात्र, अवघ्या ५ तासात भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोन करत धरणाचे दरवाजे बंद केले. त्यामुळे पाणी नियोजीत ठिकाणापर्यंत पोहोचलेच नाही. त्याकारणाने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.
गेल्या ३ दिवसापासून अमरावतीच्या तिवसा तालुक्यात पाण्यासाठी वादविवाद सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर व भाजप आमदार अनिल बोंडे यांच्यात जबरदस्त रस्सीखेच सुरु होती. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या तिवसा विधानसभा मतदारसंघात पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते. त्यामुळे सोमवारी दुपारी ३ वाजता अप्पर वर्धा धरणाचे २ दरवाजे उघडल्यानंतर ५ तासातच भाजप शिवसेनेनेच्या कार्यकर्त्यांनी धरणावर आंदोलन करून दरवाजे बंद केले होते. ३७ तासापूर्वी अप्पर वर्धा धरणातून सोडलेले पाणी तिवसा तालुक्यातुन वाहणाऱ्या वर्धा नदीत दाखल झाले.
मात्र तिवसा व मोझरी या गावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी पाणी पोहोचले नाही. या ठिकाणाहून तब्बल ६ किलोमीटर दूर अंतरापर्यंत पाणी पोहोचले आहे. वर्धा नदीत पाणी सोडल्याने, थोड्या प्रमाणात जनावरांचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला असला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर आहे. तिवसा तालुक्यातील ज्या गावात पाणी टंचाई आहे त्या गावात शासनाच्या वतीने उद्या गुरुवारी सकाळपासून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, सध्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.