अमरावती - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी रेड्डी यांच्या निलंबनाचा मुद्दा उचलून धरला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, पती राजेश मोहिते आणि आई शांताबाई चव्हाण यांच्या नावे तीन स्वतंत्र पत्र लिहिले होते. या तिन्ही पत्रात उपवनसंचालक विनोद शिवकुमार यांच्या जाचामुळे आत्महत्त्या करीत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पत्रात अपर प्रधान मुख वन संरक्षक रेड्डी यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून ते तक्रारीची दाखल घेत नव्हते. त्यांचा हात शिवकुमारच्या डोक्यावर आहे असेही दीपाली चव्हाण ने लिहिले आहे. असे असताना या प्रकरणात शिवकुमारला अटक झाली असताना रेड्डीची मात्र नागपूरला बदली करण्यात आली. दरम्यान विविध स्तरावर रेड्डी विरोधात आंदोलन पेटले. रेंजर्स असोसिएशनसह भाजप, युवास्वाभिमान हे राजकीय पक्ष या आंदोलनात उतरले होते.
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
या प्रकरणानंतर विनोद शिवकुमार यांना नागपूर स्थानकावरून तात्काळ अटक करण्यात आली तसेच त्याचे निलंबनही केले. तर अपर प्रधान सचिव व मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची पदावरून उचलबांगडी केली. मात्र, रेड्डी यांचेही निलंबन करावी, अशी आग्रही मागणी चव्हाण यांच्या नातेवाईकांनी केली होती. आज महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी, दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करावे, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. या निवेदनाची दखल घेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबनाचे निर्देश दिले आहेत.
निलंबन झाले गुन्हा दाखल करून अटक करा
आम्ही सलग चार दिवस रेड्डी विरोधात आंदोलन करतो आहे. आमच्या आंदोलनाच्या दबावामुळे आज सरकारने रेड्डीला निलंबित केले असल्याचे भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. रेड्डीला केवळ निलंबित करून चालणार नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणीही शिवराय कुळकर्णी यांनी केली.
हेही वाचा - परमबीर सिंगांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी, १३० पानांच्या याचिकेत आहेत हे मुद्दे