अमरावती - कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता आयटीआय परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (डीआरडीए) प्रशिक्षण केंद्र व तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत 100 खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी स्वतंत्र रस्त्याचीही निर्मिती होत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने डीआरडीए प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री ठाकूर यांनी केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी राजपूत, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डीआरडीए प्रशिक्षण केंद्राच्या जागेत 60 व सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरातील इमारतीत 40 अशा एकूण 100 खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण होणार आहे. महिला रुग्ण किंवा लो- रिस्क रुग्णांसाठी या स्वतंत्र व्यवस्थेचा वापर होऊ शकेल. त्याचप्रमाणे, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जिल्हा कोविड रुग्णालयासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र रस्ता असावा, म्हणून लगतच्या आयटीआय परिसरातून रस्ताही निर्माण केला जात आहे. वेळेची तातडी लक्षात घेऊन ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच ही कामे गुणवत्तापूर्ण असावीत. सर्व अद्ययावत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपचार सुविधांतही वाढ करण्यात येत आहे. आवश्यक तिथे ऑक्सिजनची सुविधा पुरवली जाईल. जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. रुग्णालयाच्या अतिरिक्त सुविधेसाठी तसेच रस्त्यासाठी सुमारे 66 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.