अमरावती : अचलपूर शहरात रविवारी रात्री जो काही प्रकार ( Achalpur Violence Case ) घडला, तो सामाजिक बांधिलकीला साजेसा नव्हता. आज प्रत्येक जाती-धर्मांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले ( MP Navneet Rana visit to Achalpur ) आहे. तसेच येथील संचारबंदी सात ते आठ तासांसाठी शिथिल करण्याचीही मागणी त्यांनी केली ( Demand for relaxation of Achalpur curfew ) आहे.
अचलपूरमध्ये शांतता समितीची घेतली बैठक : खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) हे आज अचलपूर शहराची परिस्थिती पाहण्यासाठी गेले होते. सलग तीन दिवसांपासून अचलपूर आणि परतवाडा शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील प्रतिष्ठित मंडळींचा सहभाग असणाऱ्या शांतता समितीची बैठक ( Achalpur Peace Committee Meeting ) घेतली. यावेळी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये, कोणाला असे कृत्य करण्यापासून रोखावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले.
संचारबंदी शिथील करण्याची विनंती : हातावर पोट भरणाऱ्या श्रमजीवींना संचारबंदीमुळे मोठा फटका बसतो आहे. अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पोलिसांनी एक, दोन तास सांचारबंदी शिथिल केली असली तरी, अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरातील संचारबंदी सात ते आठ तासांपर्यंत शिथिल करावी, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
दोषींवर व्हावी कारवाई : विनाकारण दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी. मात्र जे निर्दोष आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.