अमरावती: धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागली आहे. एकदा झालेला हा विकार आयुष्यभर त्रास देणारा असून मधुमेह होऊ नये किंवा हा विकार काळजी घेणे हाच एकमेव महत्त्वपूर्ण उपचार आहे. 14 नोव्हेंबरला असणाऱ्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेहा बाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने अमरावती शहर आणि जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय रुग्णालयातून मधुमेह रुग्णांना अवघ्या दहा रुपयात महिनाभराचे औषध उपलब्ध करून दिले जात आहे.
योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वपूर्ण पर्याय: मधुमेह टाळण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम हा महत्त्वपूर्ण पर्याय असल्याचे तज्ञ डॉक्टरांनी ईटीव्ही भारतची बोलताना सांगितले. संतुलित आहारासोबतच रोज तासभर पायी चालल्याने मधुमेह या आजारापासून आपल्याला दूर राहता येतं. ज्या व्यक्तींना मधुमेह जडला त्यांनी देखील जेवणात साखरेवर नियंत्रण ठेवले आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना मधुमेह जडला त्यांनी नियमित औषध घेणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे मधुमेह तज्ञ डॉ. राजेंद्र ढोरे ई टीव्ही भारतची बोलताना म्हणाले.
किडनीवर होतो परिणाम: भारतातील पंचवीस टक्के लोकांना मधुमेह जडला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे हवे तितके शक्य नाही. मात्र जनजागृती करण्याचा प्रयत्न होणे, आवश्यक असल्याचे किडनी रोग तज्ञ डॉक्टर अविनाश चौधरी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. ज्या व्यक्तींना मधुमेह जडला आहे त्यापैकी सात ते आठ टक्के रुग्णांना पहिल्या चार ते पाच वर्षात किडनीवर दुष्परिणाम झालेले आढळून येतात .आजाराचे लक्षण जाणवायला लागतात. 25 टक्के जणांना दहा वर्षांनी किडनीच्या आजाराचे लक्षण जाणवतात. एकदा किडनीचा आजार सुरू झाला की तो बरा होत नाही आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागतो. पायावर सूज येणे, थकवा येणे,शरीरातील रक्त कमी होणे, डोळ्याचा पडदा खराब होणे ही किडनी रोगाची लक्षणे जाणवतात. ज्यांना मधुमेहाने ग्रासले आहे, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असून किडनीच्या आजारा संदर्भात कुठलेही लक्षण जाणवू लागतात, अशा मधुमेह रुग्णांनी तात्काळ किडनी तज्ञांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे असल्याचे डॉ. अविनाश चौधरी म्हणाले.
डोळ्यांवर होतो गंभीर परिणाम: काळजी घेणे हेच अनेक आजारांवर प्रमुख उपचार आहेत. ज्यांना मधुमेह जडला आहे अशा रुग्णांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे मधुमेह रुग्णांनी नेत्र तज्ञांकडून आपले डोळे तपासून घ्यावे. मधुमेह प्रचंड प्रमाणात वाढला तर रुग्णांना अंधत्व येण्याची भीती देखील असल्याचे नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अतुल कलाने टीव्ही भारतची बोलताना म्हणाले.
दहा रुपयात महिनाभराची औषध: मधुमेह रुग्णांसाठी संपूर्ण राज्यात शासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नियमित तपासणीची व्यवस्था केली आहे. या सर्व शासकीय रुग्णालयात मधुमेह रुग्णांना केवळ दहा रुपयात महिनाभराचे औषध दिले जाते अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे समुपदेशक विनोद साबळे यांनी दिली.
शहर आणि जिल्ह्यात जनजागृतीवर कार्यक्रम: जागतिक मधुमेह दिनानिमित्त आजपासून तीन दिवसांपर्यंत अमरावती शहरात जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर आज सकाळी आठ वाजता पासून मोफत मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी शिबिराला भेट देऊन स्वतः मधुमेह तपासणी केली. सकाळी मुंबई वरून अमरावतीला येणाऱ्या गाडीतील प्रवाशांसह अमरावती वरून भुसावळ ला जाणाऱ्या प्रवाशांनी या शिबिरात मधुमेह तपासणी करून घेतली.
मधुमेह रुग्णांची शासकीय आकडेवारी:
वर्ष | महिला | पुरूष | एकुण |
2017-18 | 1192 | 1388 | 2580 |
2018-19 | 1616 | 1821 | 3437 |
2019-20 | 1796 | 2045 | 3841 |
2020-21 | 1195 | 1412 | 2607 |
2021-22 | 1721 | 1838 | 3559 |
2022-23 | 1070 | 1176 | 2246 |