अमरावती - गांजाची तस्करी करणारा एक ट्रक स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज नागपूर-मुंबई महामार्गावर पकडला. केळीची वाहतूक करीत असल्याचे भासवून हे लोक गांजाची तस्करी करत होते. हा ट्रक लोणीनजीक साई रिसॉर्टजवळ पकडण्यात आला. ट्रकमध्ये केळीच्या पानांमध्ये 70 लाख रुपये किमतीचा 10 क्विंटल गांजा ठेवण्यात आला होता. हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.
समाधान शंकर हिरे (वय - 32 रा. जळगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे 2 साथीदार पोलिसांनी ट्रक थांबवताच पसार झाले आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका ट्रकमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी मध्यरात्रीनंतर महामार्गावर साई रिसॉर्टजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी (एचआर-46-सी-1657) हा ट्रक अडविला. यावेळी पोलिसांना पाहून ट्रकमधील तिघांपैकी 2 जण पळून गेले. परंतु, समाधान हिरे पोलिसांच्या तावडीत सापडला.
यावेळी पोलिसांनी केळींनी भरलेल्या ट्रकची झडती घेतली. त्यावेळी केळीच्या खाली 35 पोत्यांमध्ये तब्बल 10 क्विंटल गांजा आढळून आला. पोलिसांनी समाधान हिरे याची कसून चौकशी केली असता, सदर ट्रक हरियाणा राज्यातील रोहतक येथील रहिवासी पन्नालाल बासदेव याच्या मालकीचा असल्याचे समोर आले. ट्रक चालक कच्चेलाल हरियाणा येथून ट्रकमध्ये गहू घेऊन आंध्रप्रदेशात गेला होता. आंध्रप्रदेशातून ट्रक केळी भरून वाराणसीला जात होता. या माध्यमातून गांजाची तस्करी केली जात असे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींच्या मागावर पथक पाठवण्यात आले आहे.
जागतिक अमली पदार्थ विरोधीदिनी पोलिसांनी ही महत्वाची कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, विभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे यांच्या मार्गदर्शानात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे, लोणीचे ठाणेदार एस. एस. अहिरकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, विशाल हिवरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव नागलकर, शकुर शेख, भारत देशकर, प्रकाश किल्लेदार, सुनील निर्मळ, वीरेंद्र तराळे, दिनेश जानोजीया, भागवत नागरगोजे, मोहन ठाणेकर, अमोल घोडे, अरविंद लोहकरे, नितेश तेलगोटे आदींच्या पथकाने केली.