अमरावती - शहरातील गांधी नगर या भागात राहणाऱ्या एका डॉक्टरला काही दिवसांपासून बरे नव्हते. हे डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असून काही दिवसांपूर्वी त्यांचा स्वब तपासणीसाठी घेण्यात आला होता. आज त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नी सुद्धा डॉक्टर आहेत. डॉक्टरला कोरोना झाल्याचे स्पष्ट होतात ते राहात असणाऱ्या गांधी नगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये महापालिकेने आज जंतुनाशक फवारणी केली. कोरोना ग्रस्त डॉक्टरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या पत्नी मुलगी आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या त्यांच्या सासूची तपासणी केली जाणार आहे.
यासह आज अमरावती शहरातील ताज नगर परिसरात चार वर्षीय चिमुकल्याला कोरोना झाल्याचे समोर आले असून मद्रासी बाबा नगर येथे 38 वर्षीय पुरुष शिवनगर परिसरात 33 वर्षे पुरुष कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या हिरुळपूर्णा या गावात तीन वर्षाच्या चिमुकलीला कोरोना झाला असून तिच्यासोबतच 23 वर्षाच्या महिलेलाही कोरोनाने ग्रासले असल्याचे अहवालात समोर आले आहे. अमरावती आता कोरोना सर्वच परिसरात झपाट्याने पसरत असून कोविड रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका यांनाही ही कोरोनाची बाधा व्हायला लागल्यामुळे अमरावतीकर धास्तावले आहेत.