अमरावती - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचार बंदी लागू केली आहे. सोबतच वाहतुकीसाठी आंतरराज्य सीमा बंद केल्याने व्यापारावरही याचा परिणाम झाला आहे. इतर राज्यात जाणारा 500 ट्रक संत्रा अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संत्रा मंडीत पडून आहे. या संत्र्याची किंमत 18 कोटी पेक्षा जास्त आहे.
हेही वाचा - संचारबंदीला हरताळ, अहमदनगरातील बाजार समितीमध्ये तुडुंब गर्दी
विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी परिसराला ओळखले जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे, वरुडमधून इतर राज्यात मोठ्या प्रमाणात संत्राची निर्यात होत असते.परंतु, देशभरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहे.
21 तारखेला देशभर जनता कर्फ्यू, त्यानंतर महाराष्ट्र राज्यात आता लागलेली संचार बंदी , जिल्हा बंदी आणि आंतरराज्य सीमा बंद केली गेली. यामुळे, वरुड येथून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, केरळ, बांग्लादेश आदी ठिकाणी जाणाऱ्या संत्रा मंडित पडून आहे. अमरावतीच्या वरुड येथे जवळपास 52 संत्रा मंडी आहे. सध्या संत्राला 17 ते 25 हजार रुपये प्रतिटनपर्यंत भाव मिळत असल्याने या संत्रांची किंमत 18 कोटी रुपये असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे संत्र्याचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा संत्रा हा गळून पडत आहे. त्यामुळे, संत्रा वाहतूक करणाऱ्या वाहनांना इतर राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी व व्यापारी करत आहे.
हेही वाचा - कोरोनासंबधीची संपूर्ण माहिती, वाचा एका क्लिकवर