अमरावती- मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा व माहाराष्ट्रातील सावरगाव या दोन गावात पोळ्याच्या दिवशी जीवघेणा गोटमार खेळ खेळला जातो. गेल्या शेकडो वर्षापासून हा खेळ खळला जात आहे. मात्र आज दोन गावामध्ये झालेल्या गोटमारीत पांढुर्णा या गावातील २१५ तर सावरगाव येथील २४० गावकरी जखमी झाले आहे.
या खेळात गंभीर जखमी झालेल्या ४ गावकऱ्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान मागील ७ वर्षांपासून दोन्ही गावांपैकी कुणालाही हा ऐतिहासिक झेंडा तोडता आला नाही. मात्र यावर्षी पांढुर्णा येथील युवकांनी हा झेंडा तोडला. यावेळी पोलिसांच्या मोठया फौजफाट्यात या दोन्ही गावातील गोटमार पार पडली.
जाणून घ्या काय आहे गोटमारीचा खेळ
गोटमर आख्यायिकेनुसार, पांढुर्णा व सावरगाव येथील युवक युवतीने प्रेम विवाह केला होता. या विवाहाला विरोध करीत वधूने पांढुर्ण्यात येवू नये म्हणून गोटमार करण्यात आली होती. त्यात त्या जोडप्याचा मृत्यू झाला होता. त्यांना चंडीमातेच्या मंदिराजवळ समाधी देण्यात आली होती. त्यांच्या स्मृतीचे प्रतिक म्हणून शेकडो वर्षांपासून दरवर्षी ही गोटमार करण्यात येते.
मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक गोटमार खेळली जाते. पोळ्याच्या दिवशी जंगलातून फळसाचे झाड आणले जाते. यासोबतच एक झेंडा लावला जातो. पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा झेंडा पाढुर्णा व सावरगावच्या दरम्यान असलेल्या जाम नदीमध्ये एका व्यक्तीकडून रोवला जातो. दुसऱ्या दिवशी दोन्ही गावातील नागरिक एकमेंकावर गोटमार करीत झेंडा उचलून नेतात. त्यानंतर तो झेंडा चंडीमातेच्या मंदिरात नेला जातो. यावर्षी पांढुर्ण्याच्या युवकांनी झेंड्यावर ताबा मिळवला. पूजेनंतर गोटमारीचा समारोप करण्यात आला. दरम्यान या गोटमारीत दोन्ही गावातील ४५५ नागरिक जखमी झाले.