अमरावती - जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दर आठवड्याला ३६ तासांच्या लॉकडाऊची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री आठपासून या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. तर सोमवारी सकाळी सात वाजता हा लॉकडाऊन संपेल. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण एसटी सेवा ही लॉकडाऊनमध्ये बंद असणार आहे. एकीकडे एस टी महामंडळ तोट्यात असतानाच या ३६ तासांच्या लॉकडाऊनमुळे अमरावती जिल्ह्याच्या एसटी महामंडळाला मात्र तब्बल ४५ लाख रुपयांचा मोठा फटका बसणार आहे.
बसस्थानकांत शुकशुकाट
अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळांतर्गत दररोज दीड लाख किलोमीटरचा प्रवास केला जातो.१२०० फेऱ्या या महामंडळाच्या होत असतात. परंतू ३६ तासांच्या या विकेंड लॉकडाऊनमुळे आज सर्वं बस बंद करण्यात आल्याने अमरावतीसह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांत शुकशुकाट पाहायला मिळाला. लॉकडाऊनदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाकडून जनजागृती करण्यात आली होती.