अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून गुरुवारी 21 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या 617 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णालयाला लागून असणाऱ्या अशोक नगर परिसरात 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 29, 50, आणि 25 वर्ष वयाच्या दोघींसह एकूण चार महिला आणि 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बडनेरा जुनी वस्तीमध्ये येथील दत्त कॉलनी परिसरातील 36 वर्षीय पुरुष , नवी वस्ती बडनेरा येथील 26 वर्षीय महिला, परतवाडा येथील सायमा कॉलनी येथील 70 वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी येथील 37 आणि 22 वर्षाचे दोन पुरुष आणि 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 27 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. शहरातील चक्रधर नगर परिसरातील 40 वर्षीय पुरुष, चवरेनगर येथील 51 वर्षीय पुरुष, दरोगा प्लॉट परिसरातील 60 आणि 22 वर्षाचे पुरुष, चवरेनगर परिसरातील 51 वर्षीय पुरुष, कवरनगर परिसरातील 19 वर्षीय युवक, सिंधू नगर भागातील 52 वर्षीय पुरुष, अंबिका नगर परिसरातील 42 वर्षीय पुरुष पन्नालाला नगर परिसरातील 24 वर्षीय महिला, सहकार नगर परिसरातील 32 वर्षीय महिला, गोपालनगर येथील 24 वर्षीय महिला, महेंद्र कॉलनी भागातील 41 वर्षीय पुरुष आणि ओम कॉलनी येथील दीड वर्षाच्या बालकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावतीत कोरोना रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाने जवळपास संपूर्ण अमरावती शहर व्यापले आहे. तर अंजनगाव सुर्जीमध्ये कोरोना झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.