अमरावती: न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी 6 जानेवारी 2020 रोजी पीडित मुलीची आई कामाकरिता बाहेर गेली होती. पीडित मुलगी ही घराबाहेर खेळत होती. त्यावेळी नागेशने तिला कार्टून बघण्याच्या निमित्ताने आपल्या घरात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आईने कपड्यांवरील डागाबाबत विचारणा केल्यावर पीडित मुलीने घडलेली घटना सांगितली. नागेश नंदलाल कुरिल (२५) रा. दत्तापूर, धामणगाव रेल्वे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीविरूध गुन्हा दाखल: अत्याचार केलाचा धक्कादायक प्रकार कळताच आईने दत्तापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नागेशविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण केल्यावर पोलीस उपनिरीक्षक द्वारका अंभोरे यांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
असा आहे न्यायालयाचा निकाल: या प्रकरणात न्या.पी.एन.राव यांच्या न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयासमक्ष आलेला तोंडी व वैद्यकीय पुरावा आदी लक्षात घेता आरोपी नागेशला अनैसर्गिक कृत्य व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरविण्यात आले. त्याला भादंविच्या कलम 377 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास, 3 हजार रुपये दंड, तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 (2) अन्वये 20 वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगायच्या आहेत. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील परीक्षित शरद गणोरकर यांनी यशस्वी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके व अरुण हटवार यांनी काम पाहिले आहे.
हेही वाचा -