अमरावती - सायकलशी मैत्री करण्यासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देत दोन वयोवृद्ध सायकलने प्रवासाला निघाले आहेत. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया ते थेट नेपाळ असा २ हजार ५०० किलोमीटरचा ते प्रवास करत आहेत. तिवसावरून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
सांगली येथील गोविंद परांजपे हे ८१ वर्षीय वयोवृद्ध १ मे पासून मुंबईवरून सायकलने प्रवासाला निघाले आहेत. त्यानंतर आठव्या दिवशी त्यांचे सहकारी सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश काशीनाथ पाटील (रा. पुणे वय -६०) हेदेखील त्यांच्या सोबतीला निघाले. या दोघांचे उद्देश एक असून दोघेही सायकलने मुंबई ते नेपाळ असा २ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
सायकल चालवण्याने आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंद मिळतो. यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते. तसेच पेट्रोल, डिझेल वाचवण्यासाठी सायकल चालवणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या राष्ट्राची आर्थिक बचत होण्यासोबत आपलेही बचत होईल, असा संदेश ते आपल्या सायकल प्रवासादरम्यान देत आहेत.
यावेळी बोलताना या दोघांनी आपल्या सायकलशी असलेल्या घट्ट मैत्रीची आठवण करुन दिली. आम्हा दोघांनाही लहानपणापासून सायकल चालवण्याचा छंद आहे. आमच्या या सायकल प्रवासाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासाद्वारे आम्ही लोकांना सायकल चालवण्याचे मह्त्त्व पटवून देत असल्याचे या दोघांनी यावेळी सांगितले.