अमरावती: वरुड तालुक्यात येणाऱ्या जरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर, गॅस कटरने मशीन तोडून तब्बल 16 लाख 45 हजार 500 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. केवळ आठ मिनिटांमध्ये चोरट्यांनी हा कारनामा केला. शुक्रवारी पहाटे ही खळबळजनक घटना उजेडात आली. चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अशी फोडली एटीएम मशीन: शुक्रवारी पहाटे तीन ते चार चोरटे कारने एटीएम सेंटरवर पोहोचले. एका चोरट्याने एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. तर दुसरा चोरटा आत शिरला. शटर अर्धे खाली आणल्यावर काही सेकंदात चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने तोडणे सुरू केले. केवळ आठ मिनिटांत मशीन तोडून चोरट्यांनी स्ट्रेसह 16 लाख 44 हजार 500 रुपयांची रोकड लंपास करीत तेथून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली.
चोरट्यांचा शोध सुरू: याबाबत माहिती मिळताच, वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे जरूडला पोहोचले. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेशकुमार पांडे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी श्वानपथक व ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलिसांनी ते संपूर्ण फुटेज जप्त केले. सायबर सेलच्या मदतीने चोरट्यांचे चेहरे उघड करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. या प्रकरणी एटीएम कंपनीचे व्यवस्थापक पवन भोकरे यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे.
आंतरराज्यीय टोळी असल्याचा अंदाज: अवघ्या 8 मिनिटांत गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडून 16 लाख रुपये लंपास करीत चोरटे पसार झाले. त्यामुळे एटीएम तोडणाऱ्या चोरट्यांची ही टोळी आंतरराज्यीय असावी, असा कयास लावल्या जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वरूड पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असून चोरट्यांच्या शोधात विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
हेही वाचा -