अमरावती - रविवारी कोरोनाचे एकूण 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमरावतीत कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नसून आता अमरावती कोरोनाग्रस्तांची संख्या 164वर पोहोचली आहे. जिल्हा, आरोग्य आणि महापालिका प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सपशेल अपयशी ठरत असल्याचे वास्तव आहे.
रविवारी दुपारी 4.15 वाजता प्राप्त अहवालानुसार हबिबनगर परिसरात 65, 36 आणि 30 वर्षांच्या महिलेसह 5 वर्षांची चिमुकली, 33, 22 आणि 54 वर्षीय पुरुष असे 7 जण एकाच परिसरात आढळले आहेत. यासोबतच मसानगंज परिसरात 19 वर्षीय युवक, शिवनगर परिसरात 65 वर्षांची महिला, हिलाल कॉलनी येथील 11 वर्ष वयाची चिमुकली आणि 30 वर्षांचा पुरुष यासह कोव्हिड रुग्णालयात सलग 10 दिवस सेवा देणाऱ्या परिचरिकेलाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा कहर सतत वाढत आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याचे जाणवत आहे. सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे अमरावतीकर धास्तावले आहेत.