अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरामाता मंदिरात रोठाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या युवकाचा काटेपुर्णा डोहात बुडून मृत्यू झाला. दत्ता ठाकरे असे त्या बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून डोहात त्याचा मृतदेह शोधण्यास अडचण येत होती. अखेर संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आल्याने पथकाने दत्ता ठाकरे यांचा मृतदेह डोहातून बाहेर काढला.
बोरगाव मंजु येथून रोठाच्या कार्यक्रामासाठी आलेल्या दत्ता ठाकरे ( वय 35, रा. कारला, ता. तेल्हारा, ह. मु. भोपाळ) हा आसरामाता मंदिराला लागून असलेल्या काटेपुर्णा नदीवरील डोहात बुडाला होता. याबाबतची माहिती दोनद येथील पोलीस पाटील प्रल्हाद खंडारे आणि सागर कावरे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली होती. पथक प्रमुख दीपक सदाफळे हे आपले सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये, गोविंदा ढोके, दिनेश चव्हाण, राहुल साटोटे, अक्षय डोफे, गोविंद कुरकुटे, गौरव ठोंबरे, धीरज राऊत हे रेस्कयु बोटसह सर्च ऑपरेशनसाठी घटनास्थळी 3 वाजता पोहोचले. डोहात 25 ते 30 फूट पाणी असल्याने डोह पूर्ण भरलेला होता. पथकाने गुरुवारी दुपारी 3 तीन वाजतापासून सर्च ऑपरेशन चालू केले होते. मात्र बुधवारी दुपारी पाणी सोडल्याने या डोहात पाण्याची पातळी वाढली आेह. त्यामुळे मृतदेह शोधण्यास अडचण येत होती.
यामध्ये दुर्गादेवी तथा गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात फाऊंडेशन आणि निरनिराळे साहित्य रॅम्पला अटकून येत असल्याने सर्च ऑपरेशनमध्ये अडथळे निर्माण होत होते. तरीही रात्री 10 वाजेपर्यंत शोध मोहीम चालुच होती. परंतु, कुठेही शोध लागत नव्हता. नातेवाईक आणि काही नागरिकांना हा युवक नदीमध्ये नसल्याची शंका व्यक्त केली. त्यामुळे पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांनी आसरामाता मंदीरावर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये हा युवक नदीमध्ये बुडत असताना दिसला. याबाबची खात्री झाल्याने त्या ठिकाणी पुन्हा सर्च ऑपरेशन चालू केले. शेवटी रात्री एक वाजता मृतदेह सापडल्याची माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. दत्ता ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.