अकोला - शहरातील अकोटफैल भागातील एका २८ वर्षीय तरुणाने कोरोनावर मात केली आहे. तो पूर्ण बरा झाल्याने त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज घरी सोडण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे डॉक्टर्स व सर्व पथकाने उपस्थित राहून टाळ्या वाजवून या रुग्णाला निरोप दिला.
हा रुग्ण संशयित कोरोनाबाधित म्हणून ४ एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या १३, १९, २३ व २४ एप्रिलला अशा चाचण्या करण्यात आल्या. त्यात निगेटिव्ह अहवाल आल्याने त्यास घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम तसेच उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी आदी उपस्थित होते.
आता या रुग्णास १४ दिवसांसाठी घरातच पण अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे. अकोला जिल्ह्यात एकूण १७ पॉझिटीव्ह अहवाल होते. त्यातील दोघे मृत आहेत. उर्वरित १५ पैकी पातूर येथील रहिवासी असलेले 7 जण गुरुवारी (दि.२३) तर आज (सोमवारी) अकोट फैल येथील 1 असे एकूण 8 जण पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता अन्य 7 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.