अकोला - अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चारवेळा निवडून आलेले संजय धोत्रे यांना (19 मे 2019) केंद्रीय मानव संसाधन व शिक्षण राज्यमंत्री पद देण्यात आले होते. भाजपने त्यांना मंत्रिपदाची माळ घालून जिलह्याचा बहुमान वाढवला होता. परंतु, अवघ्या दोन वर्षातच त्यांना मंत्री पदावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना कमी करण्याची कारणे काही विशेष नाही, अशी चर्चा आहे. परंतु, त्यांना पदावरून कमी केल्याने भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद मिळाले होते
खासदार संजय धोत्रे हे मराठा समाजातून येतात. ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते महाबीजचे संचालकही होते. तसेच, वेगवेगळ्या समितींवरही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. आता केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय धोत्रे यांचे पद जाणार याबाबत कुठलीही कल्पना अकोला भाजपमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नव्हती. परंतु, त्यांना अचानक पदावरून कमी करण्यात आले आहे.
भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
प्रकृती अस्वस्थ, विकास कामांबद्दल जनतेत नाराजी, नवीन मंत्र्यांना संधी देण्यासाठी, 24 महिन्यांत त्यांच्या कामाची कोणतीही छाप नाही, भाजपमधील अंतर्गत राजकारण यामुळे त्यांना पदावरून काढण्यात आले. अशी वेगवेगळी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, संजय धोत्रे यांना मंत्रीपदावरून कमी केल्याने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.