अकोला - अँड्रॉइड मोबाईल वापरणारे सर्वच हे सोशल मीडियावर अॅक्टिव आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त व्हॉट्सअॅप हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या आहे. परंतु, ज्याप्रमाणे बँक खाती, सोशल मीडिया, ईमेल हॅक केली जात आहेत. त्याच प्रमाणे व्हॉट्सअॅप हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अकोल्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यांमध्ये अशा दररोज आठ ते दहा तक्रारी येत आहेत. मात्र, या तक्रारीचे तत्काळ निराकरण होत असल्यामुळे पोलिसांकडून यामध्ये कुठलीही तक्रार नोंदविली जात नाही. आर्थिक फसवणूक सारखे गुन्हे नसल्यामुळे या गुन्ह्यांकडे पोलीस तक्रार दाखल करण्याऐवजी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.
शहरामध्ये दररोज पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप हॅक होण्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, या तक्रारी गंभीर नसून त्या सौम्य स्वरूपाच्या आहेत. या व्हॉट्सअॅपमधून कुठल्याही प्रकारचं आर्थिक व्यवहार होत नसल्यामुळे फक्त अनुचित मॅसेज फॉरवर्ड केल्यामुळे व्हॉट्सअॅप धारकाला त्रास होतो. नेमके हे मेसेज जातात कुठून, हॅक होते कुठून, या प्रकारामध्ये पोलीस सध्या तपास करीत नसले तरी कालांतराने यामध्ये पोलीस चौकशी करून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, व्हाट्सअप हॅक झाल्याचा मेल आपल्या येतो.
व्हॉट्सअॅप कसे होते हॅक -
आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये असलेले व्हॉट्सअॅप हे अचानकपणे बंद होते. त्यावर कुठले मॅसेज येत नाहीत किंवा कुठले मॅसेज जातही नाहीत. कितीही प्रयत्न केला तरी ते ओपन होत नाही. दोन दिवसानंतर ते ओपन होते. अॅप ओपन झाल्यानंतर त्यावर अनोळखी व्यक्तींचे असंख्य मॅसेज येऊन पडतात. या मॅसेजमधून आपल्याला फक्त मानसिक त्रास होतो. हा त्रास झाला की लगेच आपण पोलिसांकडे धाव घेतो.

व्हॉट्सअॅप हॅकिंगवर उपाय -
आपले व्हॉट्सअॅप हॅक होऊ नये, यासाठी सायबर पोलिसांकडून व्हॉट्सअॅपच्या संदर्भात एक सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्या सूचनांचे पालन केल्यास आपले व्हॉट्सअॅप कधीच हॅक होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट फोल्डरमध्ये 'टू स्टेप व्हेरिफिकेशन'ची प्रक्रिया पूर्ण केल्यास व्हॉट्सअॅप हे कधीच हॅक होणार नाही किंवा त्याचा दुरुपयोगही कोणालाही करता येणार नाही. व्हॉट्सअॅप हॅकिंगचे प्रकार सध्या वाढत आहेत. या प्रकारामुळे अनेक जण आमच्याकडे येत आहेत. त्यांना आम्ही व्हॉट्सअॅप हॅक नये यासंदर्भात माहिती देत आहोत. ती प्रक्रियाही त्यांच्या समक्ष करून घेत आहोत. व्हॉट्सअॅप होऊ नये यासाठी सायबर पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच त्याचा प्रचार-प्रसार ही करण्यात येत आहे. नागरिकांनी या सूचनांचे पालन केल्यास आपल्याला होणारा त्रास टाळता येऊ शकतो.
सायबर पोलिसांकडे धाव -
माझ्या मोबाईलमध्ये असलेले व्हॉट्सअॅप हॅक झाले होते. दोन दिवस व्हॉट्सअॅपमधून कुठलेही मॅसेजेस येत नव्हते आणि जात नव्हते. परंतु, तिसऱ्या दिवशी अचानकपणे व्हाट्सअप सुरू झाले आहे. असंख्य मॅसेजेस येऊन पडले. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, तुम्ही असा मेसेज कसा टाकला, तुम्हाला असे करणे योग्य नाही वाटत, असे अनेक प्रकारचे मॅसेजेस आले आहेत. याचा मला फार त्रास झाला. मी लगेच सायबर पोलिसांकडे धाव घेऊन माझ्या त्रासाबद्दल त्यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ त्यावर उपाययोजना करून मला दिलासा दिला, असे तक्रारकर्ते उमेश लखाडे यांनी सांगितले.
हेही वाचा - दुचाकीस्वारांना उडवून चारचाकी पसार; पुढे रस्ता नाही म्हणून रिव्हर्समध्ये आणली गाडी.. पाहा व्हिडिओ!