अकोला - 'माझी वारी माझी जबाबदारी' हे ब्रीद घेऊन विश्व वारकरी सेनेने आज आळंदी येथून पंढरपूरकडे पायी वारी सुरू केली. ही वारी सुरू असताना पोलिसांनी या वारकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या वारकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच भजन आंदोलन सुरू केले.
'कोरोनाच्या नियमांचे पालन करुन काढली वारी'
राज्य सरकाने मानाच्या नऊ नाही, तर राज्यातील प्रमुख वारकरी दिंड्यांना पंढरपूरच्या वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली होती. मात्र, राज्य सरकारने परवानगी न दिल्याने, वारकरी सेनेने आळंदी येथून कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करून वारी काढली. वारीमध्ये सामाजिक अंतर ठेवून, मास्क लाऊन आणि सॅनिटायझचा वापर करून ही वारी काढण्यात आली होती.
'निर्णयाला वारकऱ्यांचा विरोध'
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळा रद्द केला आहे. मानाच्या फक्त १० प्रमुख पालख्यांना परवानगी देण्यात आली. मात्र, या निर्णयाला वारकऱ्यांनी मोठा विरोध केला. या निर्णयाला विरोध करीत विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी आषाढी वारी दिंडी काढली आहे. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून ही दिंडी दिवे घाटात पोहचली होती. दरम्यान, पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन धमकावल्याचा आरोपही विश्व वारकरी सेनेचे शेटे महाराज यांनी केला आहे. राज्यसरकारने वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, विश्व वारकरी सेना पायी दिंडी सोहळ्यावर ठाम आहे. आळंदीहून सुरू केलेल्या या वारीला दिवे घाटाजवळ या वारकऱ्यांना पोलिसांनी अडवून त्याब्यात घेतलं आहे. मात्र, वारकरी सेनेने आता आहोत तिथेच भजन आंदोलन करणार असल्याची भूमीका घेतली आहे.