अकोला - अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी सायंकाळी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या हिंसक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दोन गटांतील लोक एकमेकांवर दगडफेक करताना, वाहनांचे नुकसान करताना आणि रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत. सध्या, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमुळे शहरातील हरिअर पेठ येथून पेटलेले दंगलीचे रान शहरातील अनेक भागात रात्रीच पोहोचले. या घटनेमध्ये दंगेखोरांनी अनेकांना मारहाण केली. तसेच घर व दुकान यांची जाळपोळ करीत वाहनांचीही तोफफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रात्रीच संचारबंदी लागू करण्यात आली. जुने शहर परिसरामध्ये हरिहर पेठ येथे सोशल मीडियाच्या एका पोस्टमुळे जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर दोन गट समोरासमोर आले. पोलिसांना काही कळण्याच्या आतच दंगेखोर यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात उद्रेक केला. दगडफेक, वाहनांची तोडफोड करीत आणि त्यांनी घरे आणि दुकानेही जाळली. या घटनेमुळे शहरातील जवळपास चार पोलीस स्टेशन परिसरामध्ये तणाव निर्माण झाला.
सुमारे 30 आरोपींना अटक -अकोला घटनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्रीपासून डीजीपी आणि अकोला पोलिसांच्या संपर्कात होते. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शांतता आहे. आतापर्यंत सुमारे 30 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनीही घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. अकोल्यातील कालच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी नीमा अरोरा आणि एसपी संदीप घुगे यांनी शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला सर्व धर्म आणि समाजाचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
पोलीस बळाचा वापर करून शांतता घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक तैनात केली. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि इतर जिल्ह्यातील पोलिसांचा ताफाही बोलविण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अश्रुधुरांचा वापर करण्याचे तातडीने आदेश दिले. त्यासोबतच बंदुकीच्या फैरी झाडण्याचे आदेश दिले. शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ होत असल्याने पोलीस अधीक्षकांनी हा कठोर निर्णय घेतला. दंगेखोरांना पांगाविण्यासाठी पोलिसांनी बळाचाही उपयोग करावा आहे.
शहरात संचारबंदी लागू -जुने शहरातील हरिहर पेठ येथे शनिवारी रात्री घडलेल्या घटनांनंतर काही वेळाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू केली आहे. त्यामुळे शहरात जुने शहर, डाबकी रोड, रामदास पेठ व इतर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत.
अमरावती पोलीस महानिरीक्षकांची बैठक- या घटनेची माहिती अमरावती विभागीय पोलीस महानिरीक्षकांना मिळताच त्यांनी त्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेचा आढावा घेतला. तसेच या घटनेमध्ये पोलिसांनी शहरात शांतता निर्माण व्हावी, यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेशही त्यांनी दिले. कुठलाही अनुचित प्रकार वाढू नये यासाठी पोलिसांना त्यांनी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ते आज अकोला शहरात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी घेतला आढावा - शहरातील जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी या घटनेची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यांनी तातडीने या घटने संदर्भात अमरावती पोलीस महानिरीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरामध्ये शांतता निर्माण व्हावी, यासाठी अधिक पोलीस कुमक मागविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
शांततेचे आवाहन- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक झालेल्या जमावाने काही वाहनांचे नुकसान केले आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली. वादानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जुने शहर पोलीस ठाणे येथे पोहोचला. जमावकडून जाळपोळ करत दहशत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे. या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी गाठले जुने शहर पोलीस स्टेशन- जुने शहर परिसरातील हरिहर पेठ येथे जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, शहर अध्यक्ष विजय अग्रवाल व इतर पदाधिकाऱ्यांनी जुने शहर पोलीस स्टेशन येथे घटनेसंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे सूचना केल्या आहेत. तसेच जखमींना योग्य ती उपचारासाठी मदत करण्याच्या ही सूचना केल्या आहे. शहरांमध्ये शांतता प्रस्थापित राहण्यासाठी जनतेला शांततेचे त्यांनी आवाहन केले आहे.
हिंसाचाराची दोन महिन्यातील दुसरी घटना- हिंसक जमावाने परिसरातील काही वाहनांना लक्ष्य केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. दोन गटातील हिंसाचाराची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरातील शंकर नगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे- पोलीस अधीक्षक संदीप घुगे
हेही वाचा-
Cheated By Bunty Bubli : भाजपच्या माजी नगरसेवकाला बंटी बबलीने लावला २२ लाखाचा चुना