अहमदनगर- आदर्शग्राम म्हणून ओळख असलेल्या ज्ये ष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये चक्क ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. मतदारांना साडी वाटप केल्याने चार व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.
मतदारांना वाटण्यासाठी साडी वाटपाच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार आता पारनेर पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा-सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावे - आंबेडकर
भरारी पथकाची कारवाई-
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होताना गुरुवारी उमेदवाराच्या प्रचाराची मुदत संपली आहे. असे असतानाही सुरेश दगडू पठारे आणि किसन मारुती पठारे हे व दोन महिला मतदारांना साडी वाटप करत असताना निवडणुक भरारी पथकाचे बाळासाहेब बुगे यांना निदर्शनास आले. यावेळी पथकाने साडी वाटप करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या चारचाकी वाहनात १३६ साड्या आढळून आल्या. मुद्देमालासह या व्यक्तींना पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांच्या आदेशाने या दोन्ही व्यक्ती विरोधात आचारसंहितेचा भंग केल्यावरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-अहमदनगरमधील ७०५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
बिनविरोधला विरोध करणाऱ्या पॅनलचे कार्यकर्ते!!
राळेगणसिद्धीमध्ये बिनविरोध निवडणुकीची अनेक वर्षांची परंपरा आहे. यंदाही अण्णांच्या आग्रहास्तव लाभेश औटी आणि जयसिंग मापारी यांचे दोन्ही गटाचे मनोमिलन होण्याचे प्रयत्न झाले. त्यामधून निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे स्वतः अण्णांनी याबद्दल घोषणा केली होती. मात्र, गावातील काही तरुण अण्णांना भेटले. त्यांनी लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणूक घ्यावी, अशी अण्णा हजारे यांना विनंती केली. निवडणूक लढवायची आहे, असे त्यांनी अण्णा यांना सांगितले. त्यानुसार अण्णांनी या गटाला अनुमती देत निवडणूक होऊ द्या, मात्र कोणतेही गैरप्रकार करू नका असे बजावले होते. औटी आणि मापारी गटाने एकत्र येत एक पॅनल बनवला. नवीन गटाने आपला दुसरा पॅनल उभा केला होता. भरारी पथकाने गुन्हा दाखल केलेले कार्यकर्ते हे दुसऱ्या गटातील असल्याची माहिती आहे.
राळेगणसिद्धीसारख्या आदर्श गावात निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन म्हणजे एकप्रकारे आदर्श गावाच्या प्रतिमेला काळिमा फासल्याची चर्चा आहे. राज्यात 16 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे.