अकोला - जुन्या काळी जसा राजा शिकारीला निघायचा तेव्हा संपूर्ण जंगलात हाकाटी पिटायला लावयाचा, तशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून लसीकरणाची केवळ हाकाटी पिटली आहे, अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
त्यांनी लसीकरण का केले नाही-
शनिवारी संपूर्ण देशभरात मोठा गाजावाजा करत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतरांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी स्वत: लसीकरण का केले नाही? ते पण कोरोना योद्धा आहेत, त्यांनीही लसीकरण करायला हवे. त्यांनी पहिल्याच टप्प्यात लसीकरण का केले नाही? असा सवाल करत या लसीकरण न करण्यामागच्या कारणांचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
तर लसीकरणाबाबत विश्वासाहार्ता निर्माण होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही कोरोना फ्रंटलाईन वारियर्स आहेत. त्यांना लसीकरणापासून वगळणे योग्य नव्हे. त्यांनीही लसीकरण करायला पाहिजे. सोशल मीडियावर लसीकरणाबाबत बऱ्याच अफवा पसरत आहेत. त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत. या दोघांनी लसीकरण केल्यानंतर या अफवा थांबतील व लसीकरणाबाबत विश्वासाहार्ता निर्माण होईल, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, प्रा. प्रसन्नजीत गवई उपस्थित होते.