अकोला - गत काही वर्षांपासून अकोला ते अकोट या महामार्गाचे काम रखडलेले आहे. खराब रस्त्यामुळे या महामार्गावर अनेकांचे जीव गेले असून आजही एका युवकाचा अपघातात बळी गेला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना अकोला-अकोट मार्गावरील बळेगाव फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भयानक होता की, अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणाची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पुढील तपास सुरू केला आहे.
अनेकांचे गेले बळी
अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत वर्षांपासून अकोला-अकोट या महामार्गाचे काम सुरू आहे. अतिशय संथ गतीने या महामार्गाचे काम सुरू असून मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर चिखलामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. तर या महामार्गावर आतापर्यंत अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. मात्र तरीही कोणाचेही याकडे लक्ष नाही. त्यामूळे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस यासह आदी पक्षांनी आंदोलन केले. परंतु ते अपयशी ठरले. तर दुसरीकडे या रस्त्याचे ठेकेदार बदलत असल्याने हा रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - अज्ञाताने पोलिसांच्या वाहनांची केली तोडफोड; भौरद येथे दुचाकीही फोडली